श्रीदेव केशवराज (लक्ष्मीकांत) देवस्थान
श्रीदेव लक्ष्मीकांत (केशवराज) मंदिर हे दापोली तालुक्यातील आसूद या निसर्गरम्य अशा गावात वसलेले अतिशय देखणे असे देवस्थान आहे. विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर पांडवकालीन असून, ५००० वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाच पांडवांनीच याची बांधणी एका रात्रीमध्ये केलेली आहे. काळ्या दगडामध्ये बांधलेले हे मंदिर, कोकणातील स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे. या मंदिरामधील श्रीदेव केशवराज (लक्ष्मीकांत) मुर्ती ही काळ्या पाषाणातील असून ३.५ फूट उंचीची आहे. या मुर्तीच्या हातामध्ये शंख, चक्र, पद्म आणि गदा अशी आयुधे आहेत.
आसुद गावामधून एक बांधीव रस्ता सुपारीच्या बागांमधून, थंड अशा हवेतून, सुमारे १५० पायऱ्या उतरून आपल्याला खाली नदीपर्यंत घेऊन येतो. पूर्वी या नदीवर लाकडी साकव होता, आता नदी ओलांडण्यासाठी पक्का पूल बांधलेला आहे. पूल ओलांडून परत सुमारे २५० पायऱ्या चढून आपण पोचतो केशवराजाच्या राईमध्ये.
आंबा, फणस, साग यांच्यामध्ये दगडी भिंतींच्या आत सुंदर असे मंदिर बांधलेले आहे. पुढे मंडप असून याच्या चारही बाजूला फरसबंदी केलेली आहे. मंदिराच्या समोरच मंदिराच्या वरून दगडी वाहिकेमधून आणलेले पाणी गोमुखातून बारमाही वहात असते. अत्यंत थंड आणि असे सुमधूर असे हे पाणी आहे. ही पाण्यासाठीची बांधलेली वाट देखील आपल्याला आपल्याकडील स्थापत्यशास्त्राची ओळख करून देते
श्री केशवराज हे देवस्थान हे २२ घराण्यांचे कुलदैवत आहे. त्यांची आडनावे पुढीलप्रमाणे
१. आगरकर २. आघारकर ३. बिवलकर ४. दातार ५. दांडेकर ६. देवधर ७. दिक्षित
८. ढमढेरे ९. दारशेतकर १०. भट ११. गांगल १२. राजवाडे १३. मेहेंदळे १४. परांजपे
१५. ठोसर १६. कोकणे १७. गोळे १८. भाटवडेकर १९. मायदेव २०. सबनीस २१. वैद्य
२२. जोशी (काही)









